Saturday, October 19, 2019

लग्नगाठ

" अहो, लहान आहे पोरगी , एव्हढात कस ? " आईला आपल्या मुलीची काळजी वाटत होती .
" एव्हढ्यात अगं अठराची झाली कि ती आता . " आज्जी समजावत म्हणाली .
" पण अजून शिक्षण चाललंय तिचं . "
" ते काय तिकडेही होईल कि पूर्ण . "
" पण... "
" पण नको आणि काही नको . "
" बर होऊ द्या तुमच्या मनासारख . "

==========================================================
" ठीक आहे , मी आहे तयार . पण मुलगी आधी मी बघणार . " अजयने त्यांना स्पष्टच सांगितलं .
" बर ठीक आहे आम्ही कळवतो त्यांना . " त्याच्या वडिलांनी त्याला लगेच सहमती दर्शवली .
" नको . न कळवताच जाईन मी . " अजय म्हणाला .
घरचे विचारात पडले . पण त्याने त्यांना समजावल . शेवटी सगळे तयार झाले . आता तो एकटाच मुलगी बघायला जाणार होता .
=========================================================
" आज्या काय चाललय तुझ ? असच जायच त्यांना न कळवता ? काय म्हणतील ते ? " रमेशला सोबत घेऊन जाण्याचा अजयचा प्लॅन होता पण रमेश त्याला तयार होत नव्हता .
" अरे रम्या आपण त्यांच्या घरच्यांना नाही भेटायच . आपण मुलगी बघायला चाललोय . " अजयने आपला प्लॅन त्याच्यासमोर उलगडायला सुरुवात केली .
" ते कस ? " रमेशला अजून काही समजत नव्हत .
" तू म्हणाला होतास ना त्या गावचा कोणी तुझा मित्र आहे . "
" हो किसना . "
" हा त्याच किसनाला कळव . मग बघ पुढे काय होत ते . "
अजय हे सांगत होता पण रमेशच्या डोक्यात अजून उजेड पडत नव्हता .
" तू जास्त विचार नको करू . जेव्हढं सांगतोय तेव्हढ कर . "
रमेशने काही न समजताच नुसती मान हलवली आणि किसनाला फोन लावला . अजय आणि किसनाच काय बोलण झाल ते मात्र रमेशला नाही समजल .
=========================================================
" अरे इथच म्हटलाय का ? " अजयने रमेशला विचारल .
" हो इथंच . पण काय चाललंय तुमच . एक तर तुमच काय बोलणं झालं ते मला नाही सांगितलं आणि तो फोन करून मला इथ ये तिथ ये करतोय . "
" कळेल तुला . "
ते पुढे जातच होते इतक्यात एक दगड कुठूनतरी त्यांच्या दिशेने आला . त्यांच नशिब म्हणून ते थोडक्यासाठी वाचले . त्यांनी दगड आला त्या दिशेला पाहिलं एक मुलगी उभी होती तिकडे . केस विस्कटलेले साधेसेच कपडे अशा अवतारात ती उभी होती . सोबत ४-५ लहान मुलं .
" अरे कोण तुम्ही ? दगड लागला असता ना  . अस कस कुठेही न बघता फिरताय . " ती जवळपास ओरडलीच .
" आम्ही... आम्ही ते बाजूच्या गावचे . " तिचा असा अवतार बघून रमेश बावरून सांगत होता . त्याला अजयने अडवल .
तिने त्याला अस करताना पाहिलं आणि तिला त्यांचा संशय आला . तिने त्याला विचारलं
" कोण आहेस तू ? "
" मी आज्या " त्याने उत्तर दिल .
त्याच्याकडे आपादमस्तक पहात तिने विचारलं
" काय शिक्षण झालय तुझ ? "
" माझ MBA झाल आहे . "
" आणि नोकरी ? "
" हो आहे मी जॉबला . मॅनेजरच्या पोस्टवर . "
" अस . आणि तुम्ही इथे अस माळावर काय फिरताय ? "
" ते... ते ... " रमेशला काही सुचत नव्हत .
" आम्ही निसर्ग सौंदर्य बघायला आलॊ होतो . " अजयने उत्तर दिल .
" पाहिलं का ? "
" हो "
" मग आता जावा . हि पोर काही शहाणी नाहीत "
त्यांनी एकदा त्या मुलांकडं पाहिलं . फारच अवली वाटत होती ती . मघाचा दगडही त्यांनीच मारला होता . त्यामुळे दोघांनी तिथून निघालेलच बर अस समजून ते निघाले .
==========================================================
" अरे मुलगी चांगली आहे . " आईने अजयला समजावल .
" पण अजून अल्लड वाटते आहे . " अजयने मनातलं सांगितल .
" उद्या जाऊया आपण बघायला तेव्हा बघ आणि सांग . " एव्हढं बोलून आई गेली .
तेव्हढ्यात त्याचा फोन वाजला . अननोन नंबर होता . त्याने फोन रिसिव्ह केला .
" मला माहित आहे मी तुम्हाला नाही आवडले पण इथ सगळ्यांना अस वाटतय तुम्ही येणार आहे म्हणून ... " पलीकडून ओळख न सांगताच सुरुवात झाली होती .
" कोण बोलतय ? " त्याने विचारलं .
" मी सुवर्णा . सगळी इथ वाट बघतील तुमची आणि तुम्ही नाही आला तर वाईट वाटेल त्यांना . तुमचा नकार आहे . ठीक आहे . पण उद्या या आणि मग नकार सांगा . तेव्हढ करा . " ती धाडधाड बोलून मोकळी झाली .
" अगं " म्हणेपर्यंत तिने फोन ठेवला .
=========================================================
दुसऱ्या दिवशी सगळे तिकडे गेले . तिच्या घरच्यांसोबत भेट झाली . त्यांच बोलण सुरु होत .
त्याची आई म्हणाली मुलीला बोलवा .
ती आली . हीच का ती कालची परकर पोलक्यात पाहिलेली . आज तिने साडी नेसली होती . तो तिच्याकडे पाहतच राहिला . ती आल्यापासून तिची नजर खालीच होती .
बाकीचे काय बोलत होते त्याच त्याच्याकडे लक्षच नव्हत .
तेव्हढ्यात कुणीतरी म्हणाल
" इथ सगळी आपलीच आहेत . सांगा काय तुमचा निर्णय . "
तिचा चेहरा त्रासिक झाला . तो नकार ऐकण्यासाठी ती मनाची तयारी करत होती .
परत त्याला विचारलं , " पसंत आहे का मुलगी ? "
त्याच्या तोंडातून अभावितपणे निघालं " हो "
तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं . तो अजूनही एकटक तिच्याकडेच पाहत होता . क्षणभर तिने त्याच्याकडे पाहिल आणि पुढच्याच क्षणी लाजून तिची मान झुकली .

( संपूर्ण )

No comments:

Post a Comment