Thursday, April 23, 2020

अनुराधा (भाग ४)

किती कमी वेळात पोहोचले . ट्रॅफिकमधून बाइक सहज निघते म्हणून ? छे त्याने असा कितीसा फरक पडला असता ? पण त्याच्यासोबत बोलताना वेळ कसा जातो समजतच नाही . आता एव्हढ्यातच तर निघालो होतो आणि आता लगेच पोहोचलोही . एव्हढ्यात दूर जाणं तिला ठीक वाटत नव्हतं . अजून थोडं थांबावं , अजून बोलावं असं राहून राहून  वाटत होत . तोवर ते तिच्या कॉलनीच्या गेटपाशी पोहोचले . त्याने गाडी थांबवली . तिच्या मनात उतरायचं नव्हतच . ती गाडीवर बसूनच त्याला म्हणाली
" अरे घरी चल ना . तुला कालच बोलणार होते पण राहिलंच बघ . "
तो जरा अवघडतंच म्हणाला
" अग राहू दे ग . एव्हढं काय . येईन परत . एव्हढं काही नाही . "
" मला ठीक नाही वाटणार . तू ये प्लिज . " तिला त्याच न येणं पटत नव्हतं म्हणून ती त्याला आग्रह करत म्हणाली .
आता त्याचा नाईलाज झाला होता . तो यायला तयार झाला . ते दोघे तिच्या घरी पोहोचले . तिने लॉक उघडून ते आत गेले .
" तू बस मी चहा करते . " म्हणत ती चहा करायला आत गेली .
" अग नको उगाच काही करू नको . "
" अरे झालच बघ . "
 म्हणत तिने पटकन पाणी ठेवलं .
" तू एकटीच असतेस ? "
" अरे नाही भाऊ-भावजय आहेत सोबत ते दोघ उशिराच येतात . "
तो एकटाच अवघडल्यासारखा बसून इकडे तिकडे बघत होता . तेव्हढ्यात ती चहा घेऊन आली .
" अरे एव्हढ्यात आलीस . "
" हो रोजच रुटीन आहे आले कि चहा लागतोच मला . मग आधी चहा घेते मग बाकीचं उरकते . सो झाला पटकन . "
" मग भाऊ येईपर्यंत निवांत असशील . "
" हो थोडीफार . बर एक सांग तुझ्या घरी कोण-कोण असत ? "
" आई, बाबा आणि मी "
" भाऊ-बहीण नाही का ? "
" बहीण आहे . तिचं लग्न झालं आहे . "
" आणि तुझं ? "
" काय ? "
" लग्न ? "
" नाही . नाही केलं . "
" का ? "
" आता काय सांगू आधी परिस्थिती चांगली नव्हती . त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली . मग थोडा जम बसला . तेव्हा बहिणीचं लग्न झालं . "
" आणि स्वतःच्या लग्नाचा विचार नाही केलास . "
" म्हणजे अगदी तसच नाही . आता तुझ्याशी जितकं बोलतो आहे तितकं नाही बोलत कोणाशी . का कोणास ठाऊक एक मोकळेपणा वाटतो तुझ्याशी बोलताना म्हणून तुला सांगतो . तसा रिलेशनशिपमध्ये होतो पण माझी परिस्थिती यामुळं तिच्या घरच्यांचा विरोध होता . तरीही आम्ही सोबत होतो . पण पुढे पुढे तिही दूर होत गेली . तसा मलाच उशीर झाला सेटल व्हायला . तोपर्यंत ती फार दूर गेली . लग्न झालं तिचं . आता सात वर्ष झाली तिचं लग्न होऊन . त्यानंतर मेहनत घेत गेलो . शक्य तितका सेटल झालो . पण त्यानंतर आतापर्यंत परत कधी विचार केला नाही लग्नाचा . "
त्याचा मूड थोडा खराब झाला होता .
तिला वाटलं उगाच त्याला हे विचारलं .
" आय एम सॉरी . मी उगाच तुला त्या आठवणी परत करून दिल्या . "
" इट्स ओके . बर चल निघतो आता माझी बाईक माझी वाट पाहत असेल माझी . "
" हो का ? "
" हो तर आणि सोबत त्या दोन हेल्मेटची सुद्धा काळजी आहेच ना . "
" कुणाला कशाची तर कुणाला कशाची . तरी त्याला वायर लॉक नि व्यवस्थित गाडीला लागलं आहे कि नाही हे चेक करून निघालास ना . "
" तू पाहिलंस . "
" हो तीनदा ओढून चेक केलस लॉक लागलं आहे कि नाही . "
" हो म्हणजे काय खात्री नको करायला . "
" हो पण इतकी ? "
" असू दे गं . बर थँक्स फॉर चहा . अगदी मस्त झाला होता . आणि आता निघतो मी . उद्या भेटू स्टॉपवर . "
" हो चल बाय . "
" बाय "
असं म्हणत तो गेला .
काय मी पण नाही नको तर म्हणायचं लगेच तयार झाले . पण काय हरकत आहे ? असच का म्हणून जायचं बसनं . कस वाटत ते उगाच यंत्रवत वागल्यासारखं . माणूस असल्यासारखं वाटत का तरी उगा उठायचं आवरून स्टॉपवर जायचं . त्यात बसमध्ये हि गर्दी . लटकून जायचं धड उभही राहता येत नाही . कुणाशी काही न बोलता . का कशासाठी मीही माणूसच आहे ना . मलाही वाटत कि बोलावं हसावं मोकळेपणाने . मग का नको . त्याच्यासोबत जाते तर किती दिवसातून बोलते आहे मोकळेपणाने . किती मोकळं मोकळं वाटतंय . मनावरचं दडपण दूर झाल्यासारखं वाटतंय . किती दडपणाखाली होते आणि हे कधी लक्षातही नाही आलं . पण आज ते जाणवतंय . हो नक्कीच मलाही हक्क आहे मोकळेपणाने श्वास घेण्याचा . हो उगाचच नाही नको  म्हणायला . जाऊया त्याच्या सोबत . तेव्हढीच या आयुष्यात सुखाची झुळूक वाहते .
सकाळी लवकर उठून तिने पटकन स्वतःच आवरून घेतलं आणि स्टॉपवर जाऊन उभी राहिली . अगदी नेहमीपेक्षा लवकरच आलेली ती . बराच वेळ तो काही आला नाही . तो येईल कि नाही याचा विचार करत होती एव्हढ्यात तो आला .
" अगं सॉरी सॉरी आज थोडा उशीरच झाला . तुला फार थांबाव लागलं असेल ना . "
" छे , हे काय आताच येऊन उभी राहिली आहे . "
का कोणास ठाऊक तिला वाटलं शेजारची बाई तिच्याकडे पाहते आहे . तिने तिकडे पहिले तर ती खरंच तिच्याकडेच पाहत होती . अरे हि तर मी आल्यापासून इथे उभी आहे आणि मी तर म्हटलं मी आताच आले या विचारसरशी तिने पटकन नजर वळवली आणि ती गाडीवर बसली . बसता बसता तिला स्वतःचच हसू आलं . काय आपण कशा वागतोय . पण लगेच मनात आलं असू दे ना त्याला काय होतंय . मी का काही विडा उचललाय का आयष्यभर सिरीयस वागण्याचा नि सिरीयस राहण्याचा . मनात का कोण जाणे त्या ओळी रुंजी घालत होत्या ...
' आज फिर जिनेकी तमन्ना है आज फिर मरनेका इरादा है .... '

... क्रमशः 

Wednesday, April 8, 2020

अनुराधा (भाग ३)

आपलं काय सुरु आहे ? अशी का वागते आहे मी ? १६ वर्षाची मुलगी आहे का मी ? मला असं का जाणवत आहे ? काय चाललंय माझं ? असा विचार करत ती ऑफिस बिल्डिंगमधून बाहेर आली . पाहते तर समोर तो .
" अरे तुम्ही ? "
" हो . बस अजून सुरु नाहीत म्हटलं तुम्हाला घरी सोडावं . "
" ओह थँक्स . पण तुम्हाला काय माहीत मी घरी गेले नाही . "
" कशा जाल ते बघा . "
तिने पाहिलं स्टॉपवर प्रचंड गर्दी होती . तिच्या मैत्रिणीही तिथे होत्या . तिने पटकन हेल्मेट चढवलं आणि त्याची ग्लास बंद केली . बाईक रोडवर येताना थोडासा धक्का बसला . तिचा तोल जात होता . तिने पटकन हात त्याच्या खांद्यावर ठेवला अगदी क्षणभरच . आज खूप गर्दी जाणवत होती सगळीकडे लोक अडकून पडले होते .
" तू होतास म्हणून नाहीतर मलाही असच थांबावं लागलं असत . ओह सॉरी ... तुम्ही "
" असू द्या एकेरीच बोला उगाच कशाला . "
" ठीक आहे . तू कुठे राहतोस ? "
" सृष्टी कॉलनीत "
" हो , अरे मग जवळच आहे कि. "
" म्हणूनच तर म्हटलं आपण सोबतच जाऊ शकू . "
"तू कधीपासून आहेस इथे ? "
" जन्मापासून . माझा जन्म इथेच झाला . "
" मी ऑफिसबद्दल विचारते आहे . "
" ओह , चार वर्ष झाले मी इथे आहे आधी दुसऱ्या ब्रांचला होतो . "
" म्हणजे ४ वर्षे झाले आपण जवळपास एकाच ठिकाणाहून निघतोय आणि एकाच बिल्डिंगमध्ये काम करतोय पण तरीही कधी पाहिलंही नाही एकमेकांना . "
" अगदी असच नाही मी तुला पाहिलं होत आधी म्हणून तर तुला विचारलं सकाळी नाहीतर कशाला . पण मी नेहमी हे हेल्मेटमागे असल्यामुळे तू पाहिलं नसचील . "
" असेल "
प्रवासादरम्यान पूर्णवेळ दोघांच्या गप्पा सुरु होत्या . पण जसजस घर जवळ येऊ लागलं तिला प्रश्न पडला प्रतीक घरी असेल का ? याला घरी बोलवावं कि नको . तिला निर्णय घेता येत नव्हता . तेव्हढ्यात ते तिच्या कॉलनीच्या गेटपाशी पोहोचले . तिने त्याला थांबायला सांगितलं . उतरून दोन शब्द बोलून ती निघाली . पण तिला राहून राहून वाटत होत असं कस त्याला घरी तरी बोलवायला हवं होत . तो नसता आला .... पण आलाच असता तर ? आणि असं लगेच घरी बोलवायचं तिचं तिलाच कळत नव्हतं कि काय करायला हवं. नेहमी ठराविक साच्यात जगणारी ती तिला समजतच नव्हतं अशावेळी काय करावं आणि काय नाही .
ती अस्वस्थच होती . ती प्रतिक आणि सुधाशी धड बोललेही नाही . प्रतिकने तर विचारलंही कि काय झालं म्हणून . पण तिने ते टाळलं . तिला राहून राहून वाटत होत आपण काही ठीक केलं नाही बोलवायला हवं होत त्याला घरी . काय होतंय त्याला . आला असता तर आला असता . बसला असता थोडा वेळ नि गेला असता . नाही उद्या त्याला सॉरी बोलते . असे सारखे काहींना काही विचार तिच्या डोक्यात येत होते त्याने तिला किती वेळ झोपच आली नाही मग उशिरा रात्री कि पहाटे कधीतरी झोप आली . अर्थात त्यामुळं सकाळी उठायला उशीर झाला . ती पटकन उठून बाहेर आली तर त्या दोघांचं आवरलं होत व ते दोघ निघाले होते . सुधानं एकटीनेच सगळं आवरलं होत . अनुच्या मनात आलं
' माझ्या मेलीच काय चाललंय कस वागतेय मी ? पण आता हा विचार करायलाही वेळ नव्हता . तिने स्वतःच आवरलं नि स्टॉप गाठला . रोजच्यापेक्षा आज उशीर झालेला पण मनात होतच तो गेला असेल का ? तेव्हढ्यात बस आली पण तिने थोडं थांबायचं ठरवलं आणि ती बस सोडली . बराच वेळ वाट पाहूनही तो यायचं काही लक्षण दिसेना . एव्हाना तिने अजून दोन बस जाऊ दिल्या होत्या . आपल्याला उशीर झाला यायला स्टोपवर तो गेला असेल आधीच असा विचार करत ती आलेल्या बसमध्ये चढली . आज दिवसभर तिचं कामात लक्षच नव्हतं . कधी एकदा त्याला सॉरी म्हणतेय असं झालेलं तिला . संध्याकाळी ती गडबडीतच बाहेर पडली . तिच्या मैत्रिणी तिला दिसल्या . ती जवळपास त्यांना चुकवून तिथं खाली कितीतरी वेळ त्याची वाट पाहत होती . कधी ती पार्किंग मध्ये जाऊन आली , कधी वर जाण्याचा विचार केला . काय काय करत ती तशीच तिथं घुटमळत राहिली . शेवटी न राहवून तिने ठरवलं एकदा १४व्या मजल्यावर जाऊन येऊ . असा विचार करून ती लिफ्टकडे वळली . तेव्हढ्यात लिफ्ट खाली आली . दरवाजा उघडला सगळे बाहेर जात होते आणि अचानक तो तिच्या समोर आला . तिला समजेनाच आता काय करावं .
" तू वर निघाली होतीस . "
" नाही विचार करत होते जाऊ का नको एव्हढं महात्वाचंही नव्हतं . "
" मग राहू दे ना कशाला इतकी पळापळ ? "
" हो ते झालंच . "
" मग जाऊया चल "
" कुठे काय कुठे ? घरी "
" मी जाईन ना "
" अग चल वेड्यासारखं एकटंच त्या ट्रॅफिकमधून जाण्यापेक्षा कुणी सोबत असेल तर बोलत बोलत प्रवास कसा होतो हेही समजत नाही . "
तिने नुसती मान डोलावली . ते सिग्नलवर थांबले होते शेजारच्या टॅक्सीत कोणत्याशा म्युझिक स्टेशनवर गाणं सुरु होत . विंडोची ग्लास खाली झाली आणि तिला ऐकू आलं कि जाणवलं काय होत काय माहित ' हृदयात वाजे समथिंग ... '