Wednesday, April 8, 2020

अनुराधा (भाग ३)

आपलं काय सुरु आहे ? अशी का वागते आहे मी ? १६ वर्षाची मुलगी आहे का मी ? मला असं का जाणवत आहे ? काय चाललंय माझं ? असा विचार करत ती ऑफिस बिल्डिंगमधून बाहेर आली . पाहते तर समोर तो .
" अरे तुम्ही ? "
" हो . बस अजून सुरु नाहीत म्हटलं तुम्हाला घरी सोडावं . "
" ओह थँक्स . पण तुम्हाला काय माहीत मी घरी गेले नाही . "
" कशा जाल ते बघा . "
तिने पाहिलं स्टॉपवर प्रचंड गर्दी होती . तिच्या मैत्रिणीही तिथे होत्या . तिने पटकन हेल्मेट चढवलं आणि त्याची ग्लास बंद केली . बाईक रोडवर येताना थोडासा धक्का बसला . तिचा तोल जात होता . तिने पटकन हात त्याच्या खांद्यावर ठेवला अगदी क्षणभरच . आज खूप गर्दी जाणवत होती सगळीकडे लोक अडकून पडले होते .
" तू होतास म्हणून नाहीतर मलाही असच थांबावं लागलं असत . ओह सॉरी ... तुम्ही "
" असू द्या एकेरीच बोला उगाच कशाला . "
" ठीक आहे . तू कुठे राहतोस ? "
" सृष्टी कॉलनीत "
" हो , अरे मग जवळच आहे कि. "
" म्हणूनच तर म्हटलं आपण सोबतच जाऊ शकू . "
"तू कधीपासून आहेस इथे ? "
" जन्मापासून . माझा जन्म इथेच झाला . "
" मी ऑफिसबद्दल विचारते आहे . "
" ओह , चार वर्ष झाले मी इथे आहे आधी दुसऱ्या ब्रांचला होतो . "
" म्हणजे ४ वर्षे झाले आपण जवळपास एकाच ठिकाणाहून निघतोय आणि एकाच बिल्डिंगमध्ये काम करतोय पण तरीही कधी पाहिलंही नाही एकमेकांना . "
" अगदी असच नाही मी तुला पाहिलं होत आधी म्हणून तर तुला विचारलं सकाळी नाहीतर कशाला . पण मी नेहमी हे हेल्मेटमागे असल्यामुळे तू पाहिलं नसचील . "
" असेल "
प्रवासादरम्यान पूर्णवेळ दोघांच्या गप्पा सुरु होत्या . पण जसजस घर जवळ येऊ लागलं तिला प्रश्न पडला प्रतीक घरी असेल का ? याला घरी बोलवावं कि नको . तिला निर्णय घेता येत नव्हता . तेव्हढ्यात ते तिच्या कॉलनीच्या गेटपाशी पोहोचले . तिने त्याला थांबायला सांगितलं . उतरून दोन शब्द बोलून ती निघाली . पण तिला राहून राहून वाटत होत असं कस त्याला घरी तरी बोलवायला हवं होत . तो नसता आला .... पण आलाच असता तर ? आणि असं लगेच घरी बोलवायचं तिचं तिलाच कळत नव्हतं कि काय करायला हवं. नेहमी ठराविक साच्यात जगणारी ती तिला समजतच नव्हतं अशावेळी काय करावं आणि काय नाही .
ती अस्वस्थच होती . ती प्रतिक आणि सुधाशी धड बोललेही नाही . प्रतिकने तर विचारलंही कि काय झालं म्हणून . पण तिने ते टाळलं . तिला राहून राहून वाटत होत आपण काही ठीक केलं नाही बोलवायला हवं होत त्याला घरी . काय होतंय त्याला . आला असता तर आला असता . बसला असता थोडा वेळ नि गेला असता . नाही उद्या त्याला सॉरी बोलते . असे सारखे काहींना काही विचार तिच्या डोक्यात येत होते त्याने तिला किती वेळ झोपच आली नाही मग उशिरा रात्री कि पहाटे कधीतरी झोप आली . अर्थात त्यामुळं सकाळी उठायला उशीर झाला . ती पटकन उठून बाहेर आली तर त्या दोघांचं आवरलं होत व ते दोघ निघाले होते . सुधानं एकटीनेच सगळं आवरलं होत . अनुच्या मनात आलं
' माझ्या मेलीच काय चाललंय कस वागतेय मी ? पण आता हा विचार करायलाही वेळ नव्हता . तिने स्वतःच आवरलं नि स्टॉप गाठला . रोजच्यापेक्षा आज उशीर झालेला पण मनात होतच तो गेला असेल का ? तेव्हढ्यात बस आली पण तिने थोडं थांबायचं ठरवलं आणि ती बस सोडली . बराच वेळ वाट पाहूनही तो यायचं काही लक्षण दिसेना . एव्हाना तिने अजून दोन बस जाऊ दिल्या होत्या . आपल्याला उशीर झाला यायला स्टोपवर तो गेला असेल आधीच असा विचार करत ती आलेल्या बसमध्ये चढली . आज दिवसभर तिचं कामात लक्षच नव्हतं . कधी एकदा त्याला सॉरी म्हणतेय असं झालेलं तिला . संध्याकाळी ती गडबडीतच बाहेर पडली . तिच्या मैत्रिणी तिला दिसल्या . ती जवळपास त्यांना चुकवून तिथं खाली कितीतरी वेळ त्याची वाट पाहत होती . कधी ती पार्किंग मध्ये जाऊन आली , कधी वर जाण्याचा विचार केला . काय काय करत ती तशीच तिथं घुटमळत राहिली . शेवटी न राहवून तिने ठरवलं एकदा १४व्या मजल्यावर जाऊन येऊ . असा विचार करून ती लिफ्टकडे वळली . तेव्हढ्यात लिफ्ट खाली आली . दरवाजा उघडला सगळे बाहेर जात होते आणि अचानक तो तिच्या समोर आला . तिला समजेनाच आता काय करावं .
" तू वर निघाली होतीस . "
" नाही विचार करत होते जाऊ का नको एव्हढं महात्वाचंही नव्हतं . "
" मग राहू दे ना कशाला इतकी पळापळ ? "
" हो ते झालंच . "
" मग जाऊया चल "
" कुठे काय कुठे ? घरी "
" मी जाईन ना "
" अग चल वेड्यासारखं एकटंच त्या ट्रॅफिकमधून जाण्यापेक्षा कुणी सोबत असेल तर बोलत बोलत प्रवास कसा होतो हेही समजत नाही . "
तिने नुसती मान डोलावली . ते सिग्नलवर थांबले होते शेजारच्या टॅक्सीत कोणत्याशा म्युझिक स्टेशनवर गाणं सुरु होत . विंडोची ग्लास खाली झाली आणि तिला ऐकू आलं कि जाणवलं काय होत काय माहित ' हृदयात वाजे समथिंग ... '

No comments:

Post a Comment