Saturday, June 22, 2019

आरसपानी ( भाग १ )

     सप्तरंगी स्वप्न होती तिच्या डोळ्यात . छोट्या शहरातून येताना असलेला आणि या महानगरात येऊन थोडासा मावळलेला तिचा कॉन्फिडन्स . आज ती एकटीच बाहेर निघाली होती. नुसतंच काय घरात बसून रहायचं . हा रस्ता तिला तिच्या खिडकीतून दिसायचा . पुढे जाऊन डावीकडे वळतो हा . तिथून थोडंसं पुढं गेलं कि तिथून माघारी यायचं. बस एक छोटेखानी फेरी मारून ती फ्रेश होणार होती . तिनं घरातसुद्धा काही सांगितलं नव्हतं . उगाच परमिशन घेईपर्यंत आपण माघारी येऊ एव्हढा साधा हिशोब होता तिचा.

     साधासाच वाटणारा तो रस्ता पण ती माघारी येताना चुकली होती. कुठलंसं वळण चुकलं होत तीच पण ते दुरूस्त करण्याच्या नादात ती भलतीकडेच भटकली होती . थोडासा मोकळा श्वास घेता यावा थोडंसं बंधनातून मुक्त व्हावं या विचाराने बाहेर पडलेल्या तिचा श्वास गुदमरत होता. त्या अरुंद घाणेरड्या गल्ल्या त्यातून तिला जाताना पाहून  येणारे तिच्याकडे वळून वळून पहात होते . नुकतंच तारुण्याच्या उंबरठ्यावर तिनं पाऊल ठेवलं होत . या सगळ्या प्रकारामुळे ती घाबरली होती. गोंधळली होती . काय करावं तिला सुचत नव्हतं . कुणालातरी विचारावं ,पण काय विचारावं ? तिला तिच्या बिल्डिंगचं नाव आठवतं नव्हतं , ना कॉलनीच नाव . ती शेजारच्या दुकानात विचारणार होती पण काय विचारायचं ? तिला आता खूप भीती वाटू लागली होती .

     समोरून मुलांचा एक घोळका येत होता . त्यांचा एकूण अवतार त्यांचे हावभाव पाहून ती घाबरली . ती त्या अरुंद गल्लीतून जाताना अंग चोरून त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती . पण ती मुलं तिच्या दिशेलाच येत होती. तिने घाबरून शेजारी उभ्या असलेल्या माणसाच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला . ती मुलं मुद्दाम तिकडेच येऊ पाहत होती. तिने त्या माणसाचा हात घट्ट पकडला . ते पाहून एक मुलगा पुढे आला . तिला खेचून बाहेर काढण्याचा त्याचा विचार होता. एव्हढ्यात तो माणूस वळला . त्या  मुलाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात भीती तरळली . ' सॉरी भाई ' म्हणत तो धडपडत मागे फिरला . आणि पटकन तिथून निघाला . बाकीची मुलंही तिथून पसार झाली . तिनं त्या माणसाच्यामागून डोकावून पाहिलं सगळी मुलं गेली होती . तिला हायस वाटलं . ज्याच्यामुळे आपण वाचलो त्याचे आभार मानन्यासाठी तिने त्याच्याकडे पाहिलं पण त्याला पाहून तिची भीतीने गाळणच उडाली.

... क्रमशः

No comments:

Post a Comment