Sunday, June 16, 2019

प्रियतमा भाग ३

" अगं काय किती दिवस भेटली नाहीस . कुठे आहेस कुठे ? "
" बस "
" बस ? का ? "
" माझी बस आली . " तिने पाठीमागे बोट करून दाखवलं.

त्याने बघेपर्यंत बस शेजारी येऊन उभी राहिली होती . आता तर काही बोलताही येणार नव्हतं तरीही तो तिला तसाच म्हणाला, " माझा नंबर आहे तुझ्याकडे कधीतरी फोन कर . "
तिने नुसती मान डोलावली . एक तर त्याची कार उभी होती त्यामुळे बसला व्यवस्थित उभं राहायला जागा नव्हती आणि समोर अजून एक कार उभी असल्यामुळे बस कडेला न येता जवळपास रस्त्याच्या मधेच उभी होती त्यामुळे कंडक्टर सगळ्यांना लवकर चढायला सांगत होता. त्यामुळे तीही पटकन आत चढली . त्याला अजून बोलायचं होत पण ती गेली होती . तो बसच्या दरवाज्याकडे तसाच पाहत होता. तेव्हढ्यात ती बाहेर डोकावली आणि स्माईल देऊन परत आत गेली .
" ओ मॅडम काय करताय पडाल आत या " हा आवाजही त्याच्या कानावर पडला. तो स्वतःशीच हसला.
***
Hi
Hi
ओळखलं का नाही
ओळखलं ना. तुझा आवाज लगेच ओळखतो .
हो का
हो ना . कशी आहेस ?
मी मजेत. तू कसा आहेस ?
मी पण ठीक. काय म्हणतेयस अजून ?
काही नाही सहजच फोन केला . तू म्हटलास ना फोन नंबर आहे तर कर फोन म्हणून केला.
बरं झालं तू केलास फोन . अगं आमची ट्रिप जाणार आहे बाईकवर सगळेजण दोघे दोघ आहेत. तू येशील मी एकटाच आहे .
मी कशी ?
अगं सुट्टीच आहे ना तुला ?
पण पाऊस आहे .
अगं पावसाळी ट्रिपच आहे पाऊस तर हवाच .
पण तुमचा ग्रुप . माझ्या कोणी ओळखीच नाही . मला ऑड होईल .
नाही होणार तू काळजी करू नकोस
ठिक आहे
***
हे काय आपण दोघेच
हो तुला ऑड होईल ना अनोळखी लोकांमध्ये . आपण दोघे तर ओळखीचे आहोत ना
काय हे म्हणत तिने स्माईल केलं . हे करताना तिची मान थोडी तिरकी झाली होती आणि आश्चर्य वाटल्यासारख्या भुवयांची कमान झाली होती आणि डोळे मोठे झाले होते . तिला तस पाहून त्याच्या मनात काहीतरी जाणवलं . क्षणभर तो तिला तसाच पाहत होता पण क्षणभरच , दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःला आवरलं आणि म्हणाला " चल जाऊ या . " ते दोघे निघाले पाऊस  भुरभुरत होता दोघंही चिंब होत होते आभाळातून पडणाऱ्या आणि मनात कोसळणाऱ्या पावसात .
" किती  छान आहे ना . " त्याने विचारलं
" मला थंडी वाजते आहे . "
" मग थोडी थोडी घेऊया का ? "
ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती .
" अगं तोंड बंद कर माशी जाईल. कॉफी म्हणतोय मी. तुला काय वाटलं. "
" तुझं म्हणजे ना " ती त्याला हलकेच फटका मारत म्हणाली .
" माझं काय ? "
" काही नाही चल कॉफी घेऊ . "
तेव्हढ्यात तिला काहीतरी दिसलं . तिचे डोळे चमकले .
" ए ते बघ कणीस किती भारी ना . "
त्याने तिच्याकडे पाहिलं . तिच्या डोळ्यात पाहिल्यावर असं वाटत होत जणू एखादी लहान मुलगीच . अशा छोट्या छोट्या गोष्टीवर किती खुश होणारी . तिचे  डोळेच जणू हसू लागतात बोलू लागतात .
तेव्हड्यात तिने त्याच्याकडे पाहील . त्याला आपल्याकडे असं पाहताना पाहून तिने विचारलं
"असं काय पाहतो आहेस ? "
" काही नाही तुझ्या डोळ्यात तुझ्यात लपलेली लहान मुलगी पाहतो आहे "
" चल "
" कुठे ? "
" कुठे काय कुठे कणीस घेऊया ना  "असं म्हणत ती त्याला जवळपास ढकलून घेऊन जाऊ पाहत होती .
" पण एक सांग कणीस कस खायचं कॉफीत बुडवून कि... "
" ती काफी राहूदे "
***
" काय कुठे आहे ? काम सुरु आहे ना ? का कशात गुंतला आहे ?
त्याने एकदा माग वळून पाहिलं आणि बोलला " मी गुंतत नाही कशात . प्रोफेशनच्या बाबतीत नो कॉम्प्रमाइझ तिथे मी प्रोफेशनलच असतो . "
***
त्याने फोन ठेवला. तेव्हड्यात तिने पाठीमागून आवाज दिला " अरे आज तरी त्या फोनला आराम दे .
भिजेल तो पावसात . "
" त्याच जाऊ दे . तू किती भिजली आहेस आणि तुला किती थंडी वाजते आहे . मघाशी कॉफी पिली असती तर तू नको म्हणालीस . "
" ते राहू दे रे कॉफी " तिला बोलायलाही अवघड होत होत.  त्याने त्याच जॅकेट काढून तिला दिल . तिने ते घातलं.
" आता नाही ना वाटत नाही ना थंडी ? "
" आता बर वाटतंय . "
त्यानं समोर पाहिलं . समोर होता दूर जाणारा नागमोडी रस्ता आणि धुंद करणारा पाऊस आणि सोबत ती .

... क्रमशः

No comments:

Post a Comment