" अरे तुला उमा आठवते . " रोहन आठवणींच्या खोल डोहात उतरत असल्यासारखा म्हणाला .
" ती शेंबडी ? " राजेश मात्र अजून इथेच होता आणि त्याला भूतकाळ बहुदा असाच आठवत असावा . त्यावर रोहन थोडा चिडला . त्याने राजेशकडे रागानं पाहिलं . पण क्षणात स्वतःला सावरत म्हणाला
" ते तेव्हा "
" मग आता सुकलाय का " राजेश अजून त्याच मूडमध्ये होता .
रोहनने परत स्वतःला सावरलं आणि म्हणाला
" तू बघ एकदा मग कळेल " त्याच्या डोळ्यात बदाम तरळले होते .
" म्हणजे माझ्यासाठी विचारतो आहेस का ? स्थळ म्हणून सुचवतो आहेस का ? " राजेश अजून त्याच्या भावना समजू शकत नव्हता . पण त्यामुळे रोहन पुरता भांबावला आणि पटकन म्हणाला
" ए नाही नाही . माझाच इंटरेस्ट आहे . " त्याच्या डोळ्यातले बदाम गडद होत चालले होते .
" बर " राजेश त्याच्या पुढं बोलण्याची वाट पाहू लागला . थोडा वेळ स्वतःच्या स्वप्नात हरवून होता मग एक दीर्घ श्वास घेऊन तो सांगू लागला .
" अरे बऱ्याच दिवसांनी अचानक भेट झाली . म्हणजे मी ओळखलंच नव्हतं तिला . तस म्हणजे तिनेपण मला नव्हतं ओळखलं . "
" मग कस रे ? " राजेशला आश्चर्य वाटल्याचं पाहून रोहन थोडा सुखावला होता व आता फुलून सांगू लागला .
" अरे तिथे सगळे डिटेल्स सांगायचे होते आणि मी सांगत होतो . म्हणजे त्याआधी १० मिनिट आम्ही सोबत उभे होतो . ती माझ्या मागेच उभी होती पण नाही ओळखलं . पण मी माझं पूर्ण नाव सांगितलं तशी ती पुढं येऊन मी सांगत असलेली माहिती ऐकत होती . मला समजत नव्हतं असं का चाललंय . पण मग तिनेच स्वतःहून ओळख सांगितली . अरे किती वर्षांनी भेटलो होतो . आपण प्राथमिकला सोबतच होतो जयप्रकाश मध्ये . " - रोहन
" जयप्रकाश विद्यालय . हं आता त्याच नाव पण बदललं . म्हणजे ते आपल्या नंतरच्या एक-दोन बॅच नंतरच बदललं होत . पण ... बर ते असो तू सांग " - राजेश
" हो आणि त्यानंतर ती परगावी गेली ते परत भेटलीच नाही . आणि आता अशी... अशी ओळख व्हावी . किती वर्ष गेली मध्ये . पण मग त्यावरूनच किती बोलणं झालं आमचं . किती बोललो आणि किती नाही काहीच समजत नव्हतं . इंजिनिअर आहे ती . "
ते ऐकून मग मात्र राजेशला राहवलं नाही आणि त्याने रोहनला मधेच अडवून विचारलं
" आणि तरीही तिचा विचार करतोयस ? "
काहीही न कळून रोहनने विचारलं " म्हणजे ? "
" अरे बघ तुम्ही दोघंही इंजिनिअर मग पोटापाण्याच काय ? " राजेशने स्पष्टीकरण दिल .
" अरे छे तस काही नाही . तीच चांगलं चाललं आहे . " - रोहन
" आणि तुझं काय ? गेली ४ वर्ष जॉब सोडायचा म्हणतोय , स्वतःच काही करायचं होत तुला . काय कन्सेप्ट आहे ते पण नाही सांगत आहेस . " - राजेश
" अरे एकदा होऊ दे रे मग सांगेन . " - रोहन
" जशी तुझी मर्जी " - राजेश
" पण तुला सांगू किती वेळ बोलत होतो काही समजलाच नाही . खूप लाघवी बोलते रे ती . " - रोहन
राजेशने पाहिलं तो काही तिच्या स्वप्नातून बाहेर येत नाहीये . ते पाहून तो स्वतःशीच हसला आणि म्हणाला
" हं , तुला ती बंडी आठवते का ? " - राजेश
" बंडी ? कोण ? " - रोहन
" अरे ती रेणुका " - राजेश
" ? " - रोहन
" अरे चौथीपर्यंत होती आपल्या सोबतच . " - राजेश
" हो ? " तो डोक्याला ताण देत म्हणाला " बंडी म्हणजे ती खालच्या आळीतली तर नाही ? "
" तीच ती " - राजेश
" तुला तिच्यात इंटरेस्ट होता ? " रोहनने आश्चर्याने विचारले .
" ते नाही रे . ती आपल्यासोबत होती प्राथमिकला ते म्हणतोय . " - राजेश
रोहनच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडत नव्हता . तो तसाच म्हणाला
" अच्छा . पण तीच काय ? "
" हा . तर ती किती वर्षांनी आता भेटली . तिचं लग्न झालं . दोन पोरं आहेत तिला . " - राजेश
" काय सांगतोस " रोहनचा विश्वासच बसत नव्हता यावर .
" अरे लवकर झालं लग्न , मग लगेच मूल . बाकी काही लोकांची ती पद्धतच आहे . लग्न करा आणि एक दोन पोरांचं लोढणं तिच्या गळ्यात मारा आणि मग कसही राहा , कसही वागा तिच्याशी . ती काही करू शकत नाही , कि कुठं जाऊ शकत नाही . " राजेश तळमळीने सांगत होता . पण त्याला काय मुद्दा सांगायचा आहे हे मात्र रोहनच्या लक्षात येत नव्हतं . तरीही तो तसाच म्हणाला
" हं , खरं आहे तुझं . "
राजेश मात्र पुढं सांगतच होता .
" तो जग्गू आता रिक्षा चालवतो . पव्या, आपला पव्या किती हुशार होता . पण पुढे काही नाही केलं . बाबांचं किराणा मालाच दुकान होत , तेच चालवतो आहे आता . राजा ... शाळेत किती वर्ष ढकलगाडी सुरु होती त्याची किती वर्ष नापास होत होता काय माहित पण आता पुढारी झालाय . त्या दिवशी दिसला पांढरे कपडे सोबत एक-दोन कार्यकर्ते . बोलावं म्हटलं तर त्याच सुरु झालं त्याचे साहेब , त्यांचा पक्ष , समाजकार्य . मी पटकन काढता पाय घेतला तिथून . "
" हो का ? " यावर नक्की काय बोलावं हे रोहनला समजत नव्हतं त्यामुळं तो इतकाच बोलू शकला .
" अरे हे सगळे आहेत ना ते आपण सगळे एका वर्गात होतो . पण आता बघ प्रत्येकाचं आयुष्य किती बदललंय . " राजेश अजूनही धगधगतच होता . रोहनने मात्र आता पुरती शरणागती पत्करली होती . आणि तो फक्त त्याला होकार दर्शवत म्हणाला
" हो खरंय तुझं . "
" तेच सांगतोय तुला . तेव्हाची गोष्ट वेगळी होती , तेव्हाच जगच वेगळं होत . आणि मुलींचं कस असत ना त्यांच्या अपेक्षा फार असतात आणि आपण समान वयाचे असू तर आपण सेटल होईतो त्या लग्न होऊन जातात पण . म्हणून सांगतोय उगाच भलत्या मोहात पडू नकोस . "
राजेश इतकं काही बोलला होता कि रोहनला स्वप्नातून एकदम भानावर आल्यासारखं काहीतरी झालं . तो एकदम शांत झाला . त्याच्या खांद्यावर थोपटून राजेश तिथून निघाला .
============================================================
" अरे त्यानंतर आपण भेटलोच नाही . आणि आता हे लोकडाऊन असताना कस केलस ? "- रोहन
" अरे मोठी स्टोरी आहे सांगेन कधीतरी निवांत . "- राजेश
" बर पण फोटो तरी टाक कि नुसतं आपलं ' Married ' एव्हढच स्टेटस अपडेट केलंस . " - रोहन
" अरे हो करायचं सगळं . येईल फोटो पण . बर चल परत बोलू आता गडबडीत आहे . " असं म्हणत त्याने फोन ठेवला . इकडे रोहन मात्र त्याने हे सगळं कस केलं असेल याच विचारात होता .
चार दिवसात स्टेटसला फोटो आला . उमा आणि राजेशचा गळ्यात हार घातलेला .
' हर एक फ्रेंड कमीना होता है ' गाणं फोटोच्या बॅकग्राऊंडला वाजत होत, कि बाहेर कि त्याच्या बॅकग्राऊंडला वाजवलं जातंय हेच त्याला कळेना .
No comments:
Post a Comment